गडचिरोली, (जिमाका) दि.17: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने जिल्ह्यात दिनांक 15 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यात विविध बाबींवर निर्बंध लागू केले आहे. निर्बंध आदेश निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहणार असून संबंधीत सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केले आहे
*शासकीय कार्यालय व विश्रामगृहे परिसरात सभा घेण्यास निर्बंध*
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय आवारात राजकीय कामासाठी रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक राजकीय घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे.
*सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध*
नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शीत करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर(नष्ट) करुन ईमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निर्बंध लावण्यात आले आहे.
*नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध*
राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा हितचिंतक यांनी तसेच मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने इतर उमेदवाराचे नाव व त्यांना नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मत पत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध आहे.
*धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध*
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध राहील .
*सार्वजनिक ठिकाणाजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध*
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
*जात धर्म भाषावार शिबिरांचे आयोजनास निर्बंध*
जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात/ भाषा/ धार्मिक शिबीरांचे /मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध राहील.
*मोटारगाड्या /वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध*
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या/वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध राहील.
*प्रचार वाहनावर कापडी फलक/ झेंडे लावण्यावर निर्बंध*
निवडणूक प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबीसाठी बंधन राहील. यानुसार फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंडस्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासुन २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, ईतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. तसेच फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.
*ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध*
निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षपकाचा वापर पोलीस अधीकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 पुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
*रहदारीस अडथळा निर्माण करणारे साहित्य लावण्यास मनाई*
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा ठिकाणी निवडणूकीसंबंधी पोस्टर, बॅनर्स, पॉम्पलेटस, कटआऊटस, होर्डिंग्ज, कमानी लावने वा निवडणूकीचे साहित्य लावण्यास मनाई राहील
*खाजगी जागेवर झेंडे भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध*
निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाचे परवानगीशिवाय व सबंधीत परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध राहील.
*नामनिर्देशन दाखल करतांना अवलंब करावयाची कार्यपध्दती*
निवडणूक कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या /वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक /सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.
उपरोक्त आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर 2024) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

