आंतरराज्यीय चोरीच्या टोळीला आमगाव पोलिसांनी केली जेरबंद

0
1685

आमगांव : गोंदिया, चंद्रपूरसह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि ओरिसा राज्यात सक्रिय असलेल्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला आमगाव पोलिसांनी पकडले. या टोळीने अनेक ठिकाणी चोरी आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केले होते. तिघा आरोपींचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अटक केली असून, यातील दोघांना गजाआड करण्यात आले, तर एका विधी संघर्ष बालकाला बाल सुधार गृहात दाखल केले आहे.

आज दि.17 ऑक्टोबर 2024 रोजी आमगाव पोलीस स्टेशनचे पो. उप नि. नरेश शहारे आणि त्यांच्या पथकाने भंडारा कारागृहातून एका गुन्ह्यातील आरोपी प्रविण अशोक डेकाटेला ताब्यात घेऊन आमगावकडे जात होते. अर्जुनी मार्गावर तिघा संशयास्पद व्यक्ती दुचाकीवर आढळून आले. पो. शि. मन्यार यांनी त्यांच्या मोटारसायकलचा पाठलाग केला. भरधाव वेगात असलेली दुचाकी स्लिप झाल्याने आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आमगाव पोलीस पथक आणि डुग्गीपार पोलीस पथकाने त्वरित कारवाई करत डुग्गीपार येथील तलावाजवळ आणि जंगलात पाठलाग करून त्यांना पकडले.

आरोपींची ओळख

1. देवा नागय्या पिटला (42 वर्षे)

2. राजेश राजू पिटला (20 वर्षे)

3. विधी संघर्ष बालक (12 वर्षे) – राहणार नेल्लुर, आंध्रप्रदेश

जप्त केलेला मुद्देमाल : पोलिसांनी आरोपींकडून युनिकॉर्न दुचाकी, लोखंडी साहित्य, 34,300 रुपये रोख, आणि एक ओप्पो मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चौकशी दरम्यान, आरोपींनी विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. खालीलप्रमाणे गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे:

1. आमगाव पोलीस स्टेशन, जिल्हा गोंदिया: 1.5 लाख रुपये चोरी

2. बिलासपूर जिल्हा तारबहार पोलीस स्टेशन: 2.5 लाख रुपये चोरी

3. राजनंदगाव जिल्हा डोंगरगड पोलीस स्टेशन: 2 लाख रुपये चोरी

4. जंजीर चंपा: 1.5 लाख रुपये चोरी

5. बालाघाट जिल्हा नवेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन: 4.35 लाख रुपये चोरी

6. चंद्रपूर जिल्हा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन: 6.5 लाख रुपये चोरी

7. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन, चंद्रपूर (गुन्हा क्र. 216/22)

8. बिलासपूर जिल्हा कारभार पोलीस स्टेशन: मोटार सायकल चोरी

9. भुवनेश्वर जिल्हा चंद्रपूर पोलीस स्टेशन: 1.5 लाख रुपये चोरी

आमगाव पोलिसांनी आरोपींची सखोल चौकशी सुरू ठेवली आहे. आंतरराज्यीय स्तरावर चोरी आणि बॅग लिफ्टिंग गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, ठाणेदार तिरुपती राणे आणि पो. उप नि. नरेश शहारे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या कारवाईत अंमलदार लिखिराम दसरे, असीम मण्यार, अक्षय कवरे, राजु गजपुरे, नितिन चोपकर, विनोद उपराडे, चेतन शेंडे, राजेश चौधरी, योगेश मुनेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डुग्गीपार पोलीस पथकाचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

आमगाव पोलीस पथकाने दाखवलेल्या धाडसाचे आणि कौशल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.