सालेकसा – बाजीराव तरोने
महाराष्ट्रातील गोंडगोवारी समाजाने आपल्या मागण्यांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, समाजाचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या मागण्या मान्य न झाल्याने सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
गोंडगोवारी समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करत आहे. जानेवारी २०२४ पासून या मागण्यांसाठी कृती समितीने आंदोलन आणि उपोषण सुरू केले होते. २६ जानेवारीला उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंडगोवारी समाजाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी के.एल. वडणे समिती स्थापन केली. समितीने अहवाल सादर केला असला तरी, सहा महिने उलटूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही.
गोंडगोवारी समाजाचे नेते दिनेश भैयालाल कावरे यांनी सांगितले की, “आम्ही अनेक वर्षांपासून एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी करत आहोत, पण शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.”
गोंडगोवारी समाजाच्या या बहिष्कारामुळे निवडणुकीवर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

