राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
गोंदिया, दि.18: विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, उद्योजकता, संगणक क्षेत्रातील कामगिरी, नैसर्गिक आपत्तीमध्ये साहाय्य, तसेच देश/राज्याच्या प्रतिष्ठेला उंचावणाऱ्या कार्याबद्दल हा सन्मान दिला जाईल.
वर्ष 2023-2024 मध्ये दहावी बोर्ड परीक्षेत 90% किंवा बारावी परीक्षेत 85% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या माजी सैनिक किंवा त्यांच्या पाल्यांना 20,000 रुपये विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यासोबतच IIT, IIM, AIIMS किंवा इतर नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ज्यांनी या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांनी 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, गोंदिया येथे अर्ज सादर करावेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोंदिया यांनी दिली आहे.