ब्रेकिंग न्यूज़: वाघाच्या हल्यात एका व्यक्तीचा मृत्यू

0
205

सिंदेवाही तालुक्यात डोंगरगाव येथील घटना

चंद्रपूर, प्रतिनिधी मनोज गोरे

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, डोंगरगाव शिवारात वनक्षेत्र क्रमांक 252 मध्ये वाघाने 50 वर्षीय विलास तुळसीराम मडावी यांच्यावर हल्ला करून त्यांना एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. गंभीर जखमी झाल्याने विलास मडावी यांचा मृत्यू झाला.

विलास तुळसीराम मडावी आणि त्यांचे काही सहकारी सिंधी (लाकूड) तोडण्यासाठी डोंगरगावच्या जंगलात गेले होते. वनक्षेत्र क्रमांक 252 मध्ये असताना, मडावी हे त्यांच्या सहकाऱ्यांपासून काही अंतरावर होते. तेव्हा अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना फरफटत नेले. सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे वाघाने मडावी यांना सोडून पळ काढला.

सहकाऱ्यांनी तातडीने डोंगरगाव गावातील ग्रामस्थांना आणि वनविभाग तसेच पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी, सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पीएसआय सागर महल्ले घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि वनविभागाने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग आणि पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

Previous articleपोलीस प्रशासनाकडून आंतरराज्य सीमा सुरक्षा आढावा बैठक
Next articleजनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम…..