उपजिल्हा प्रतिनिधि/ पंकज रहांगडाले
गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांना भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.. भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्रातील 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर गोंदियातून विनोद अग्रवाल व आमगाव इथून संजय पुराम यांना भाजपाने संधी दिली आहे. तीनही उमेदवारांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळत असून सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांना भाजप पुन्हा संधी देणार की, याठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी देणार याकडे सर्व कार्यकर्त्यांच्या नजरा लागून होत्या. मात्र विजय रहांगडाले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तर आमदार विजय रहांगडाले यांना पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी राज्यातील महायुती सरकार व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहे.

