माळी समाजाच्या मतांचा वापर करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा – धीरज ठाकरे

0
141

माळी समाजाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार

माळी समाजाच्या अपेक्षांची पूर्तता अद्याप अपूर्ण

गोंदिया : माळी समाजावर केवळ मतांसाठी विसंबणाऱ्या नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचे ठाम आवाहन माळी समाज जिल्हा उपाध्यक्ष धीरज ठाकरे यांनी केले आहे. “माळी सत्ता संवाद” दौऱ्यादरम्यान विविध गावांना भेट देत त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधला आणि माळी समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले 

महाराष्ट्रातील एक मोठा समाज घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळी समाजाने अनेक नेत्यांना सत्तेत पोचवले आहे. मात्र, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना म्हणावा तसा न्याय मिळालेला नाही, हे वास्तव धीरज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये माळी समाजाला अपेक्षित वाटा मिळालेला नाही. माळी समाजाच्या प्रतिनिधींना आवश्यक तेवढा निधी दिला जात नाही. हा दुजाभाव पुढील काळात खपवून घेतला जाणार नाही. आता माळी समाज त्यांचा हक्काचा वाटा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.”

येत्या विधानसभा निवडणुकीत माळी समाजाच्या मतांचा वापर करणाऱ्या नेत्यांना स्पष्ट संदेश देत, समाजाने योग्य नेत्यांना निवडून देण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले. “आता जो समाजाच्या विकासाला प्राधान्य देईल, त्याच नेत्यांना साथ दिली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

माळी समाजाच्या हितासाठी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी या संवाद दौऱ्यादरम्यान व्यक्त केला. “आम्ही आमच्या हक्कांसाठी आणि समाजाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणार आहोत. समाजाच्या विकासाला महत्त्व देणारे नेतेच आमचा पाठिंबा मिळवतील,” असे धीरज ठाकरे यांनी सांगितले.