मा. श्री. ए.टी. वानखेडे, प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश गोंदिया यांचे निर्णय
गोंदिया : आज दिनांक २१/१०/२०२४ रोजी विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नामे तौसिफ शेख, वय २३ वर्षे, ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया, यास २० वर्षाचा सश्रम कारावास व १२,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरण असे की, आरोपी तौसिफ शेख ईसाख शेख, वय-२३ वर्षे, रा. ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया, पो.स्टे. केशोरी याने दिनांक १५/०९/२०२२ रोजी दु. ०२.०० ते ०३.०० वाजताचे दरम्यान पिडिता वय ५ वर्षे ही अंगणवाडीतून घरी परत आल्यानंतर आरोपी त्याच्या घरी बाथरूम मध्ये आंघोळ करित होता तेव्हा पिडिता ही त्याच्या जवळ गेली असता आरोपी तौसिफने तिच्या अंगावरील कपडे काढून आंघोळ करून दिली व तिच्या सु च्या जागी आपल्या हाताचे बोट टोकले जे की कायद्यानुसार लैंगिक अत्याचार आहे. असे घृणास्पद कृत्य आरोपीने केल्यामुळे पिडितेला असहनिय वेदना झाल्या. त्याचप्रमाणे आरोपीने पिडितेला अशीही धमकी दिली होती की सदर बाब आईला सांगू नको नाहीतर तिला मारून टाकीन असे बोलल्याचे पिडितेने तिच्या आईला सांगितले.
सदर बाब फिर्यादी (पिडितेची आई) वय २३ वर्षे शेताच्या कामावरून घरी परत आल्यानंतर दुपारी ३.०० वाजता तिने तिच्या आईला घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली. यावरून पिडितेच्या आईने दिनांक १७/०९/२०२२ रोजी पो.स्टे. केशोरी येथे आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली होती. सदर फिर्यादीच्या
तकारीवरून पो.स्टे. केशोरी येथे आरोपीविरूध्द कलम ३७६ (अ, ब), ५०६ भा.द.वि. व सहकलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधि. २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक संदिप इंगळे यांनी करून आरोपीविरूध्द विशेष न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार/पिडित पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वसंतकुमार चुटे व कृष्णा डी. पारधी यांनी एकुण ०७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.
एकंदरित आरोपीचे वकील व पिडिते तर्फे सरकारी वकील वसंतकुमार चुटे यांचे सविस्तर युक्तीवादानंतर मा. न्यायालय मा. ए. टी. वानखेडे प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश, गोंदिया जि. गोंदिया यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे तौसिफ शेख ईसाख शेख वय २३ वर्षे, रा. ता अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया, यांसः-१) भारतीय दंड विधानाचे कलम ३७६ (अ) (ब) अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व रूपये ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास ,२) भारतीय दंड विधानाचे कलम ५०६ अंतर्गत ०२ वर्षांचा सश्रम कारावास व रूपये २,०००/- दंड व दंड न भरल्यास ०२ महिन्याचा अतिरिक्त कारावास ,३) तसेच कलम ०६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधि. २०१२ अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व रूपये ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास असा २० वर्षाचा सश्रम कारावास व एकुण रूपये १२,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली.
तसेच सदर दंडाचे एकुण रकमेपैकी रूपये ११,०००/- एवढी रक्कम पिडितेला देण्याचे आदेशित करून सानुग्रह अनुदानाकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मा. न्यायालयाने पारित केले.
सदर प्रकरणात पोलीस अधिक्षक गोरख भांमरे यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक गणेश वनारे यांचे देखरेखीत, पोलीस पैरवी कर्मचारी पुनम ठाकरे, म. पो.शि. ब.न. २२४७, पो.स्टे केशोरी यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.

