गोंदिया : जिल्ह्यातील “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.२१ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले आहे. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या प्रशिक्षणाच्या तीन महिन्यांचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी दिवाळीच्या आधी मोबदला देण्याची मागणी केली.
गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी ऑगस्ट २०२४ पासून प्रशिक्षण घेत आहेत. अनेक प्रशिक्षणार्थींना अद्याप ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांचा प्रलंबित मोबदला मिळालेला नाही. काहींना केवळ ऑगस्ट महिन्याचा मोबदला प्राप्त झाला आहे, परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे देयक बाकी आहे. दिवाळी सारखा सण जवळ आल्यामुळे, प्रशिक्षणार्थ्यांनी तातडीने देयक वितरित करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्रशिक्षणार्थी, ग्रामपंचायत योजनादूत, तसेच तालुका समन्वयक उपस्थित होते. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली व त्यांना लागणाऱ्या तात्काळ मदतीची मागणी केली.
प्रशिक्षण घेत असताना येणाऱ्या प्रवास आणि इतर खर्चांची पूर्तता करण्यासाठी या मोबदल्याची गरज आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रशिक्षणार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या सणाच्या आधी सर्व प्रशिक्षणार्थींना तीन महिन्यांचे देयक वितरित करावे, अशी एकमुखी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या निवेदनावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

