राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा समन्वयक आणि आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

0
284

गोंदिया : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी तारीख जाहीर झाल्यानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तयारी जोमाने सुरू आहे. महायुतीसोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून समन्वय साधण्याचे काम चालू आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार, महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व घटकांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने गोंदिया येथे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

ही बैठक गोंदिया शहरातील स्वागत लॉन येथे आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार राजेंद्र जैन आणि विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध घटक, सेल, तसेच गोंदिया शहर व ग्रामीण समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सहभाग यावरून आगामी निवडणुकीतील विजयाचा विश्वास वाढला आहे.

माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. महायुती सरकारने गोरगरिबांच्या विकासासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही.” त्यांनी विविध योजनांची माहिती दिली जसे की: वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर योजना , गोरगरिबांच्या मुलींसाठी मोफत उच्च व्यावसायिक शिक्षण , लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना ,शेतकऱ्यांसाठी मोफत व दिवसा वीजपुरवठा , सिंचन प्रकल्प, मेडिकल, आणि रेल्वे यासारखी विकासकामे प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या भाषणात महायुतीतील सर्व घटक पक्षांमधील समन्वयावर भर दिला. “महायुतीच्या माध्यमातून गोंदिया विधानसभा क्षेत्रात झालेल्या विकास कामांच्या आधारे आम्ही निवडणूक जिंकणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित राहून महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन केले.

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी, आघाड्यांचे प्रतिनिधी, विविध सेलचे सदस्य आणि गोंदिया शहर तसेच ग्रामीण भागातील समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Previous articleजिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी १०५ अर्जांची उचल
Next articleमुख्य रस्त्यावर वाहतुकीची समस्या गंभीर, स्थानिकांची तातडीने कारवाईची मागणी