राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा फटका : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

0
80

गोंदिया: येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशामुळे अजित पवार गटासाठी राजकीय समस्यांची नवीन मालिका उभी राहिली आहे.

शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रखर नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक कार्यकर्त्यांनी आपली विचारधारा बदलण्याचा निर्णय घेतला. या प्रवेश सोहळ्याचे आयोजन काटोल येथील अनिल देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी माजी पालकमंत्री अनिल देशमुख आणि माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य  कैलास पटले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात प्रवेश केला. सोबतच माजी सभापती कृ उ बा समिती तिरोडा  वाय. टी. कटरे,  फंदुलाल पटले,  अशोक पटले, सुरेंद्र लिल्हारे,  रामप्रसाद राऊत, तरुण कनोजे,  पंकज परिहार,ब्रिजलाल परिहार, छन्ना नागदेवे,  मोहन तितिरमारे,  रुपेश मदनकर,  भरत बुद्धे,  लखन कडव,  मनोहर पटले,अनिल कनोजे,  मेघनाथ अंबुले,  शिवशंकर सोनेवाने,  राजकुमार रहांगडाले, अनिश सागरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. यामध्ये काही सरपंच आणि उपसरपंच यांचाही समावेश होता.

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव अल्पसंख्यक विभागाचे नासिर घाणिवाला आणि तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे समन्वयक सौ. मेघा सुनिल बिसेन यांचीही उपस्थिती होती.

या राजकीय हालचालीमुळे तिरोडा-गोरेगाव परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे पक्षांतर महत्त्वपूर्ण ठरू शकते.

 

Previous articleवनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतीला संजीवनी – कृषी अधिकारी दिहारे
Next articleमतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024