युवा सेनेचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना इशारा
- भंडारा (दि.२५) : लोकशाही असल्याने प्रत्येकच राजकीय पक्षाला तिकिटावर दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र हे करताना कोणाच्या विरोधात बोलत असू तर सभ्य भाषेचा वापर करायला हवा. भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांकडून आंदोलना दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संदर्भात करण्यात आलेला एकेरी भाषेचा वापर खपवून घेतला जाणार नाही. महायुतीत तेढ निर्माण होईल असा प्रयत्न कोणीही करू नये असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे भंडारा लोकसभेचे युवा सेना अध्यक्ष जॅकी रावलानी यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी भंडारा लोकसभेची जागा भाजपाला मिळावी म्हणून मागणी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हे करताना भाजपचे भंडारा तालुकाध्यक्ष आणि काही नेत्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विषयी एकेरी शब्दात बोलून त्यांचा अपमान केला. या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज युवासेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. लोकशाहीत तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत तुम्ही प्रयत्न करा. त्याला मुळीच आमचा विरोध नाही. मात्र ही मागणी करताना दुसऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करताना शब्दाचा वापर काळजीपूर्वक आणि जपून केला जावा, हे महत्त्वाचे आहे. भाजपच्या तालुकाध्यक्ष आणि एका नेत्याकडून आमदारांबद्दल केलेले वक्तव्य संतापजनक असे आहे. भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकेरी भाषेचा वापर शोभत नाही. केवळ एक दोन व्यक्तींमुळे जर युतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असेल तर याची काळजी पक्षातील वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे असेही रावलानी म्हणाले.
एकेरी आणि अशा असभ्य भाषेचा वापर आम्हालाही करता येतो. मात्र एकमेकांच्या सोबतीने लढताना शब्द आणि भाषेवर नियंत्रण ठेवले जावे एवढीच अपेक्षा आहे. आम्हीही 2019 मध्ये ताकतीने अपक्ष लढून विजय खेचून आणला. तुम्हाला विश्वास असेल तर तुम्हीही तुमच्या उमेदवाराला मैदानात उतरवून तुमची मागणी खरी आहे हे सिद्ध करून दाखवा, याला आमचा मुळीच विरोध नाही.
परंतु आमच्या नेत्यावर एकेरी भाषेत बोलून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असेल तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही असेही रावलानी म्हणाले. भंडारा विधानसभेत हा प्रयत्न झाल्यास संपूर्ण लोकसभेचा युवासेना प्रमुख म्हणून गोंदिया जिल्ह्यात ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार आहेत तेथे अशी भूमिका घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असेही रावलानी म्हणाले.
पत्रकार परिषदेला शहर प्रमुख मनोज साकुरे, शुभम साकोरे, शैलेंद्र श्रीवास्तव, कृष्णा ठवकर, श्रीवास्तव, किशोर नेवारे, दीपक श्रीवास्तव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.