

गोंदिया : धान पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेत पिकाला सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. गोंदिया जिल्हा संपूर्ण देशात धान उत्पादनासाठी ओळखला जातो, आणि या पार्श्वभूमीवर, आमगाव तालुक्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेती सुधारण्यासाठी “शेती शाळा” आयोजित केली.
आमगाव तालुक्यातील ठाणा टोला येथे शेती शाळा
आमगाव तालुक्यातील ग्राम ठाणा टोला येथे आयोजित करण्यात आलेल्या शेती शाळेत, २५ शेतकऱ्यांचे गट तयार करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यात आले. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देताना, रोग व कीड नियंत्रणाच्या उपाय योजना, तसेच त्यांच्या जीवन चक्र व येण्याच्या कालावधीची माहिती दिली.
हवामान बदल आणि शेती पद्धतींची माहिती
हवामानातील बदलामुळे धान पीक लावण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना श्री पद्धत आणि पटटा पद्धत याबद्दल सखोल माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.
या शेती शाळेत मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेल्या तज्ञांमध्ये एस. वाय. ब्राह्मणकर, बी. जी. बिरणवार आणि सी. जी. बिसेन यांचा समावेश होता. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पिकांची निगा राखण्याचे तंत्र, तसेच हवामान बदलाचे प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले.
शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेले हे शिक्षण त्यांच्या उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोलाचे ठरेल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला.


