मोरगाव/अर्जुनी आणि आमगाव विधानसभेची जागा न सुटल्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेणार टोकाची भूमिका
गोंदिया : महाविकास आघाडीच्या वतीने मोरगाव/अर्जुनी आणि आमगाव विधानसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला न मिळाल्यास कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेण्याची तयारी केली आहे. सोशल मीडियावर कार्यकर्ते आपली भूमिका कणखरपणे मांडत आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत वादाला सुरुवात झाल्याची चर्चा जिल्हाभरात जोर धरू लागली आहे.
जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून वेगळा गट तयार केला. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुन्हा भरारी घेईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, युवा नेते मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला जिल्ह्यात चांगली बळकटी मिळाली आहे.
मोरगाव/अर्जुनी आणि आमगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनुक्रमे राजकुमार बडोले आणि भाजपाकडून संजय पुराम यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळकटी मिळवून देण्यात मिथुन मेश्राम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी मोरगाव/अर्जुनी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, तर आमगाव विधानसभा मतदारसंघात युवा नेते विलास चाकाटे यांनी २४ तारखेला पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संभाव्य बंडखोरी
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत कलह होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची शक्यता असल्यामुळे या परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाविकास आघाडीतील तणावाची स्थिती आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आगामी भूमिका यावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.