आमगांव (२७ ऑक्टोबर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमगांव पोलीस ठाण्याच्या डि.बी. पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमास अटक केली असून, एकूण १,४१,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात कालीमाटी बीट परिसरात करण्यात आली.
२७ ऑक्टोबर २०२४ रोजी आमगांव पोलीस ठाणे हद्दीतील कालीमाटी ते भोसा रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना, पोलीसांना एक मोटारसायकल संशयास्पदरीत्या तीन मोठ्या थैल्यांसह जाताना दिसली. थांबवून चौकशी केल्यानंतर चालकाने त्याचे नाव डेलेन्द्र लक्ष्मीचंद हरिणखेडे, वय ४३ वर्षे, रा. परसवाडा, ता. गोंदिया असे सांगितले.
चौकशीदरम्यान, मोटारसायकलवरील कापडी थैल्यांची तपासणी केली असता त्यात ९० एमएलच्या फिरको संत्री ब्रँडच्या देशी दारूच्या ८०० बाटल्या, ज्याची एकूण किंमत २८,००० रुपये आहे, तसेच १८० एमएलच्या ४८ बाटल्या, ज्यांची किंमत ३३६० रुपये आहे, अशा एकूण ३१,३६० रुपयांचा अवैध दारू साठा आढळला. या सोबतच, लाल-काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच ३५ एबी ०५४८), ज्याची अंदाजे किंमत १,१०,००० रुपये आहे, जप्त करण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपी डेलेन्द्र लक्ष्मीचंद हरिणखेडे याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत (कलम ६५ (अ), (ई), ७७ (अ)) गुन्हा क्र. ५२६/२०२४ नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई मा. पोलीस अधिक्षक गोरख भामरे (गोंदिया जिल्हा), अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा (कॅम्प देवरी) यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यामुळे निवडणुकीच्या काळात अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांची सजगता दिसून येते.
सदर कारवाईत सहभागी अधिकारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे (आमगांव पोलीस ठाणे),पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे,पोलीस हवालदार दुधराम मेश्राम , दसरे ,पोलीस शिपाई विनोद उपराडे , चेतन शेंडे, असिम मन्यार, नितीन चोपकर , स्वप्निल शेंडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
आमगांव पोलीसांनी केलेली ही कारवाई निवडणुकीच्या काळात अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरले आहे. यामुळे पोलीस दलाच्या सतर्कतेचे दर्शन घडत असून, अवैध दारू व्यवसायावर कडक कारवाई करण्याच्या निर्धाराचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.