खासदार डॉ. किरसान यांच्या निवास्थानी भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये मोठा प्रवेश

0
808
1

गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ही घटना प्रगती नगर येथील गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या निवासस्थानी घडली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने या प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पक्षांतराचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने या पक्षांतराला महत्त्वाचे मानले जात आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उद्दिष्टांप्रती पूर्ण निष्ठा आणि एकजुटीने काम करण्याची हमी दिली. डॉ. किरसान यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून काँग्रेसच्या धोरणांचे महत्त्व विशद केले आणि आगामी निवडणुकीत पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

प्रवेश सोहळ्यात वंदना काळे, जिल्हाध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी, गोंदिया,विमल कटरे, जिल्हा परिषद सदस्य,छायाताई नागपूरे, जिल्हा परिषद सदस्य, गीताताई लिल्लारे, जिल्हा परिषद सदस्य, इशूलाल भालेकर, जिल्हा सचिव, रामसिंग चव्हाण, जिल्हा महासचिव,नीलम हलमारे, काँग्रेस कार्यकर्त्या, निकेश मिश्रा, काँग्रेस कार्यकर्ते, राहुल अमर, काँग्रेस कार्यकर्ते,दुष्यंत किरसान, काँग्रेस कार्यकर्ते,अभय ढेंगे, काँग्रेस कार्यकर्ते,डॉ. संजय देशमुख, काँग्रेस कार्यकर्ते,प्रभादेवी उपराडे, काँग्रेस कार्यकर्त्या,राजू काळे, काँग्रेस कार्यकर्ते, कैलास भोयर तसेच प्रमुख नेते आणि पदाधिकारी व कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांचा हा प्रवेश काँग्रेससाठी सकारात्मक ठरू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

डॉ. किरसान यांनी या कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्याचे महत्त्व सांगितले आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. आगामी निवडणुकीत काँग्रेसला बळकटी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने मैदानात उतरून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांच्या एकजुटीनेच निवडणुकीत यश मिळवता येईल, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला असून, नव्या कार्यकर्त्यांचा पक्षात समावेश ही त्या दिशेने उचललेली महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

 

Previous articleवनरक्षक काहुडकर यांचा सपत्नीक सत्कार
Next articleअर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या नामांकन दाखलासाठी भव्य सभा