समीर भिमटेची वुशू क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
141

आमगाव : तालुक्यातील इंदिरा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, कालीमाटी येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे. या स्पर्धेत अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी समीर भिमटे याने १७ वर्षाखालील ४० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत क्रीडा संकुल, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती.

समीर भिमटे याने या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. या नेत्रदीपक यशामुळे त्याची निवड आगामी राष्ट्रीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे, जिथे तो महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. समीरच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोमेश्वर पडोळे, उपाध्यक्ष जे. के. जिभकाटे, शाळेच्या प्राचार्या प्रतिभा पडोळे तसेच इतर सर्व सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या यशामुळे समीरने आपल्या कुटुंबाचा, शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला एक नवा आयाम मिळाला असून, शाळेच्या वतीने त्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.