अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ५६वे पुण्यस्मरण विविध उपक्रमांनी साजरे
गोंदिया : डोंगरगाव (खजरी) येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ५६वे पुण्यस्मरण दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरे करण्यात आले. ह्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. लोकचंद राणे यांच्या हस्ते अधिष्ठान पूजन, ध्वजवंदन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ग्यानिराम खोटेले, उपाध्यक्ष खेमचंद राणे, सचिव छगनलाल ब्राह्मणकर, मंडळातील पदाधिकारी, सेवक, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
सामुदायिक ध्यानानंतर प्रा. डॉ. लोकचंद राणे यांनी आपल्या चिंतनपर मार्गदर्शनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जीवनात ध्यान साधनेचे महत्त्व सांगितले. एकाग्रतेने साध्य केलेल्या ध्यानामुळे जीवनातील अनेक महत्त्वाचे उपक्रम सहज साधता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, तुकडोजी महाराजांनी ध्यानाला अग्रस्थान दिले, कारण कार्याच्या यशासाठी एकाग्रता अत्यावश्यक असते. तसेच, त्यांनी सांगितले की, तुकडोजी महाराज हे मानवतेचे महामेरू होते, ज्यांनी आदर्श ग्राम निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण केले.
२६ व २७ ऑक्टोबरला आयोजित या महोत्सवात सामुदायिक ध्यान, योगाभ्यास, सामूहिक ग्रामगीता वाचन, रामधून, परिसर व ग्राम स्वच्छता हे उपक्रम राबविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रसंतांचे जीवन व कार्य” या विषयावर निबंध स्पर्धा व “राष्ट्रसंतांचे ग्रामगीतेतील विचार” या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली. गावातील वक्ते व शिक्षकांसाठी “राष्ट्रसंतांची आदर्श ग्राम संकल्पना” या विषयावर परिसंवाद देखील झाला.
महिला मंडळाचे भजन, आचार्य ह. भ.प. मुन्नालाल ठाकूर महाराज यांचे “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन व कार्य आणि त्यांची ग्रामगीता” यावर प्रवचन झाले. तसेच दिनांक २७ ऑक्टोबरला गोपालकाला कीर्तन व छबिलाल चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष ग्यानिराम खोटेले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुखदेव मानकर, कार्यकारी ग्राम सेवाधिकारी यांनी व्यक्त केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आदर्श जीवनाचा आदर्श व कार्याचा संदेश देत या पुण्यस्मरण महोत्सवाचा समारोप अत्यंत शांतता व उत्साहात पार पडला.

