अवैध दारूभट्टीचा पर्दाफाश; आरोपीला अटक
सालेकसा / बाजीराव तरोने
सालेकसा तालुक्यातील टेंभुटोला परिसरात अवैधरित्या चालविल्या जाणाऱ्या दारूभट्टीवर सालेकसा पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १.१० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत पार पडली.
सविस्तर माहितीनुसार, सालेकसा पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना टेंभुटोला (पिपरीया) परिसरातील जंगलात अवैधरित्या दारूभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असता, घटनास्थळी १०४० किलो सडवा मोहफुल, दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य आदी एकूण १ लाख १० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी छबीलाल कवडू चौधरी (वय ६५ वर्षे, रा. टेंभुटोला, ता. सालेकसा) याच्यावर सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि थेरे, पोउपनि नागदीवे, तसेच पोलीस हवालदार टेंभूर्णे, तुरकर, जांभुळकर, पगरवार आणि ओपी पिपरीया पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
सालेकसा तालुक्यात अवैध दारूविक्री रोखण्यासाठी केलेली ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.