तिरढे (ता. पेठ, जि. नाशिक) – नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक या संस्थेच्या वतीने यंदा दिवाळीचा एक वेगळा रंग पाहायला मिळाला. कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित शेतमजूर व गरजू लोकांसोबत दीपावली साजरी करत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा एक अनोखा उपक्रम संस्थेने राबवला.
प्रत्येकाला ज्ञान आणि प्रेरणेचा दीप लावावा, ही विचारधारा घेऊन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांना शंभरहून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान व्यक्त करणारा होता. दिवाळीला नवीन साडी घालण्याचा आनंद त्या महिलांना मिळाला, ज्याची त्यांनी मोठ्या आनंदाने अनुभूती घेतली.
संस्थेच्या “एक हात माणुसकीचा” या उपक्रमांतर्गत गरीब व दुर्लक्षित लोकांसोबत फराळ वाटप करण्यात आले आणि फराळाचा आनंद त्यांच्या सोबत साजरा करण्यात आला. याशिवाय गरजू मुलींना ड्रेस, शेतमजुरांना शर्ट-पॅन्ट, लहान मुलांना मिठाई व वह्यांचे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक घरात दीप उजळण्यासाठी पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांचेही वाटप करण्यात आले.
उपस्थित मान्यवर आणि संस्थेचे कार्यकर्ते
या उपक्रमात नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अश्विनी पाटील, मीनाक्षी नागपुरे, दीपा भावसार, खजिनदार संदीप देव, तिरढे गावाचे माजी सरपंच सोमनाथ नाठे, चंद्रकांत नाठे, नामदेव नाठे, गावातील ज्येष्ठ नागरिक विठोबा भारुड, मुरलीधर नाठे, हरिभाऊ भारुड, हरिभाऊ वार्डे तसेच दीपक अग्रवाल, अनिल नाहर, आणि एडवोकेट प्रकाश सुराणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे तिरढे गावातील गरजू कुटुंबांना दिवाळीचा आनंद मिळाला, आणि त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने उजळली.