आमगाव : भवभूती शिक्षण संस्था संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगाव येथे दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी विदर्भस्तरीय अविष्कार प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संशोधनासाठी तरुणांना प्रोत्साहन देणे, त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेण्यास मदत करणे व त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणे होते.
उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या स्पर्धेचे अध्यक्षपद केशवभाऊ मानकर यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून आमगावचे तहसीलदार श्रीमती मोनिका कांबळे आणि डॉ. अजय गोस्वामी (केबीसी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, जळगाव), डॉ. दामोदर गोपाले (प्रो अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी, भंडारा), धनंजय जोशी (व्हाईस प्रेसिडेंट, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल, मुंबई), व श्रीमती सोनाली पडोळे (एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल, मुंबई) उपस्थित होते.
केशवभाऊ मानकर यांनी आपल्या भाषणात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना असे म्हटले की, “संशोधनामुळे नवीन ज्ञानक्षेत्रे समजून घेणे सोपे होते, तसेच समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विचारशीलतेला चालना मिळते.” मुख्य अतिथी मोनिका कांबळे यांनी शैक्षणिक संशोधनाच्या महत्त्वावर भर देत, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्वतःला प्रगल्भ करण्याचे आवाहन केले.
विदर्भातील विविध ३० महाविद्यालयांतील १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत विविध विषयांवर आपले संशोधन सादर केले. विद्यापीठाच्या प्रयत्नातून दरवर्षी महाविद्यालयीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात येते व यावर्षीही ती यशस्वीपणे राबविण्यात आली. विजेत्यांना विद्यापीठ स्तरीय परीक्षकांकडून गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. के. संघी (टेक्निकल ॲडव्हायझर), डॉ. तुलसीदास निंबेकर (प्राचार्य व झोनल कोऑर्डिनेटर, विदर्भ), प्रा. देवेंद्र बोरकर आणि प्रा. राणी भगत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोशनी अग्रवाल व चंद्रशेखर बडवाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक चेतन बोरकर, जितेंद्र शिवणकर, महेंद्र तिवारी, अनिल सोरी, मनीषा बिसेन, खुशी गुप्ता, वैशाली चुटे, नानेश्वरी पटले, दीपिका बोपचे, दीक्षा खोब्रागडे, परमेश्वर वानखेडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, संशोधनाची दृष्टी विकसित करणे व त्यांना वैज्ञानिक ज्ञानसंपन्न करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

