शाखा अभियंता अजय रहांगडाले आणि ग्रामपंचायत अधिकारी हेमंत लेंढे निवडणूक कर्तव्यावर गैरहजर आढळल्याने निलंबित

0
980

गोंदिया, दि. 11: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात नियुक्त असलेले दोन अधिकारी निवडणूक कर्तव्यावर अनधिकृतपणे अनुपस्थित आढळल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अजय यशवंत रहांगडाले आणि पंचायत समिती गोंदियाचे ग्रामपंचायत अधिकारी हेमंत वसंत लेंढे यांना निवडणूक कामकाजात कसुर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

10 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9.45 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया येथील स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक 2 आणि 3 ची तपासणी केली. तपासणी दरम्यान, गोंदिया उपविभागातील शाखा अभियंता अजय यशवंत रहांगडाले (पथक क्र.2, कार्यकाळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत) आणि पंचायत समिती गोंदियाचे ग्रामपंचायत अधिकारी हेमंत वसंत लेंढे (पथक क्र.3, कार्यकाळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत) या दोघांचेही आपल्या नियुक्त ठिकाणी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. हे अधिकारी रात्री 11 वाजेपर्यंत कर्तव्यावर उपस्थित नव्हते, ज्यामुळे निवडणूक कामकाजात झालेली ही गंभीर चूक मानली गेली आहे.

कर्तव्याच्या उल्लंघनामुळे निलंबनाची कारवाई

या घटनेत अधिकारी अजय रहांगडाले आणि हेमंत लेंढे यांनी कर्तव्यावरील दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 च्या नियम 3 नुसार गंभीर स्वरूपाची कसुर केल्याचे समजले गेले आहे. यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील नियम 3 च्या तरतुदीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून अजय रहांगडाले आणि हेमंत लेंढे यांना तात्काळ निलंबित केले आहे.

कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आवाहन

निवडणूक कामकाजात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी नियमितपणे उपस्थित राहावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सूचित करण्यात आले आहे.

 

Previous articleरक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
Next articleहलबिटोला येथे संस्कृती जोपासत ठेवली परंपरा कायम