40 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती

0
1056

गोंदिया, दि.13: लोकशाही प्रधान देशात 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मुलभूत अधिकार आहे. हा अधिकार बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते. शासन व प्रशासनाकडून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत विविध मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील 40 मतदान केंद्रांचे नियंत्रण पूर्णपणे महिलांच्या हाती देण्यात आले आहे. या मतदान केंद्रांवरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांभाळण्याचे ठरविण्यात आले आहे.

महिलांसाठी खास पिंक मतदान केंद्रे

भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली असून, गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आजच्या महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे आणि त्या कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिलांना निवडणूक प्रक्रियेत अधिक सक्रिय सहभाग घेण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून पिंक मतदान केंद्रांचा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच लोकशाही बळकट करण्याचा एक प्रयत्न आहे.

महिला मतदान केंद्रांची यादी

1. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ :112 – वडेगाव,127 – बौध्दनगर,128 – कोदामेडी,129 – सडक/अर्जुनी,160 – बाम्हणी/सडक,242 – धाबेटेकडी अ.,244 – महालगाव,257 – निलज,267 – मालकनपूर आणि 285 – येरंडी.

2. तिरोडा विधानसभा मतदारसंघ : 78 – तिरोडा,80 – तिरोडा,90 – तिरोडा,109 – खैरबोडी,125 – काचेवानी,252 – कुऱ्हाडी,262 – कटंगी बुज.,265 – गोरेगाव,275 – हिरडामाली आणि 285 – घोटी.

3. गोंदिया विधानसभा मतदारसंघ : 178 – गोंदिया,179 – गोंदिया,225 – गोंदिया,226 – गोंदिया,227 – गोंदिया,257 – गोंदिया,258 – गोंदिया,259 – गोंदिया,260 – गोंदिया आणि 261 – गोंदिया.

4. आमगाव विधानसभा मतदारसंघ : 61 – रिसामा, 80 – आमगाव, 83 – आमगाव, 84 – आमगाव, 85 – आमगाव, 167 – आमगाव खुर्द, 171 – सालेकसा , 243 – देवरी , 245 – देवरी  आणि 248 – देवरी.

या महिला मतदान केंद्रांची निर्मिती करून प्रशासन महिलांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करत आहे. महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करणे हे देशातील लोकशाही बळकट करण्यास मदत करेल. पिंक मतदान केंद्राच्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता, सोयीसुविधा आणि मतदानाच्या प्रक्रियेतील सक्रिय सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.