गोंदिया, दि.14 : भारत निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2024 च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने 66-आमगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आज द्वितीय प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे दोन सत्रात मतदान पथकाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे आयोजित करण्यात आलेल्या 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदान पथकाचे द्वितीय प्रशिक्षणातील प्रथम सत्रास आज भेट दिली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी निवडणुकीतील महत्वाचा टप्पा म्हणजे मतदान प्रक्रिया सुरुळीत पार पाडणे यासंदर्भात त्यांनी मतदान पथकास सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रिया संदर्भातील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे आणि जबाबदाराने पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जावून त्याची तपासणी करावी. मतदानाच्या दिवशी महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडून त्याची माहिती तयार करुन निवडणूक विभागाला सादर करावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देवरी महेंद्र गणवीर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आमगाव मोनिका कांबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सालेकसा नरसय्या कोंडागुर्ले यांनी मतदान पथकास प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी प्राधान्याने करावयाच्या बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी सर्व यंत्रे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर मॉकपोल घेणे. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये व मतदान यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.