गडचिरोली,दि.17 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. मतदारसंघात 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजतानंतर जाहीर प्रचारास बंदी राहील. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. निवडणूक ओळखपत्राशिवाय (EPIC) कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांतून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन निवडणूक यंत्रणाने केले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. मतदारांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.