



आमगाव, १८ नोव्हेंबर : दिवाळीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आदर्श विद्यालय, आमगाव येथे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानाचे महत्त्व पटवून दिले. “आई-बाबा मतदान करा, २० नोव्हेंबरला” या संदेशाने विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. “चुनाव का पर्व, देश का गर्व” या घोषवाक्यानुसार आदर्श विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी सक्रियपणे या अभियानाचा भाग झाले आहेत.
या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक यू. एस. मेंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मतदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “लोकशाही व्यवस्थेच्या मजबुतीसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करतील, तरच हा प्रयत्न यशस्वी होईल.”
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. १००% मतदान सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळा परिसरात मतदानाबद्दल सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाने समाजात आदर्श निर्माण केला आहे.


