
आमगांव : क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 16 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे नागपूर विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूर विभागातील भंडारा, नागपूर शहर, गोंदिया, वर्धा, नागपूर ग्रामीण, गडचिरोली, चंद्रपूर शहर व चंद्रपूर ग्रामीण या जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला.
के.के. इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या कनक सावसाकडेने आपल्या उत्कृष्ट कौशल्याने सुवर्णपदक पटकावले. तिच्या कामगिरीमुळे ती राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
त्याचबरोबर, माधव मेंढे व भव्या दोनोडे यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी करीत रजत पदक पटकावले. या यशाने संपूर्ण शाळेचा गौरव वाढवला आहे.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर, कार्यकारी डॉ. संघी सर, मुख्याध्यापिका रिना भुते मॅडम तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे. शाळेच्या सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कनकची ही कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली असून तिच्या पुढील यशासाठी संपूर्ण तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


