शतप्रतिशत मतदानासाठी जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदिया : मतदान प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली गोंदियातील केटीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये (KTS GMC) स्वीप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय परिसरात रुग्ण, त्यांच्या नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मा.सीईओ साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली. या अंतर्गत रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भेट देऊन त्यांना 100% मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी एमजेपीवाय कार्यालयाच्या समोर रुग्ण, कर्मचारी आणि नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले गेले.
या मोहिमेत डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. जयंती पटले, डॉ. रितीक उन्हाळे, डॉ. मयंक जैतवार, श्री. नागपुरे, श्री. टेंभुरने तसेच आरोग्य मित्र आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मतदार चिठ्ठ्या वाटप करून मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
या मोहिमेत केटीएसच्या कॅम्पसमध्ये उपस्थित डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना ‘मतदान करा आणि इतरांनाही प्रोत्साहित करा’ हा संदेश दिला. तसेच भरती रुग्णांच्या नातेवाईकांनाही मतदार स्लिपचे वाटप करून त्यांना 100% मतदानासाठी आग्रह धरला.
ही मोहिम अत्यंत यशस्वी ठरली असून, उपस्थितांनी मतदानाच्या हक्काचा महत्त्वपूर्ण वापर करण्याची ग्वाही दिली. अशा उपक्रमांमुळे लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढून गोंदिया जिल्हा ‘100% मतदान’ साध्य करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

