संविधान दिन विशेष : आमगांव पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

0
91

२६/११ च्या शहीदांना आदरांजली व लोककल्याणासाठी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

आमगांव : गोंदिया जिल्हा पोलीस दल व एचडीएफसी बँक, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधून तसेच २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार, निष्पाप नागरिक व विदेशी नागरिकांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे आयोजन २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आमगांव पोलीस स्टेशन येथे करण्यात आले आहे.

एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने या शिबीराला विविध आधुनिक सुविधा पुरविल्या जाणार असून रक्तदात्यांसाठी विशेष सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.

या शिबीरासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित डॉक्टर, व सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, जे प्रत्येक रक्तदात्यास योग्य मदत करतील.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक वर्षासाठी वैद्य डोनर कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डाद्वारे रक्तदात्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयांना रक्ताची गरज भासल्यास सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाईल.

प्रत्येक रक्तदात्यास नाश्ता, स्वीट, मोठी पाण्याची बाटली व रक्तदानाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

सामाजिक बांधिलकी व शहीदांना आदरांजली

२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच लोककल्याणासाठी योगदान देण्याचा उद्देश या शिबीरामागे आहे. रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

रक्तदानासाठी नोंदणी प्रक्रिया : पोलीस स्टेशन आमगांव हद्दीतील पोलीस अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी व सर्वसामान्य नागरिकांना २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नावे नोंदविण्यासाठी महिला पोलीस अंमलदार छिपे: ७७९८२९०५३५ , पोलीस अंमलदार लांजेवार: ९६७३४१५७७० संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.

संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित या रक्तदान शिबीराला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समाजबांधिलकीचे उदाहरण घालून द्यावे, असे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस दल व एचडीएफसी बँक, गोंदिया यांनी केले आहे.

“आपले रक्तदान – लोककल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल!”

 

Previous articleगोंदियातील विधानसभा निवडणूकीत चारही मतदारसंघांत विजयाचे पताके फडकले
Next articleदेवळी -पुलगाव मधून भाजपा महायुती चे राजेश बकाने यांचा अदभूत विजय…….