संविधान दिवस व 26/11 हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतिदिनानिमित्त पोलीस पाटलांचा सत्कार

0
117

आमगांव : गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिवस व 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आमगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला.

संविधान दिवसाचे महत्त्व पटवून देणे व 26/11 च्या हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. याशिवाय 2024 मध्ये विविध सण, उत्सव व निवडणुकांदरम्यान शांततेत आणि जबाबदारीने कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस पाटलांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा एक भाग होता.

आमगाव तालुक्यातील पोलीस पाटलांनी 2024 मध्ये मोहरम, पोळा, तान्हा पोळा, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव आणि विधानसभा निवडणूक बंदोबस्त यांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी शांतता व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ गीते आणि आमगाव पोलीस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सत्कार समारंभात तालुक्यातील पोलीस पाटलांपैकी सुरेश कोरे, किशोर दोनोडे, प्रदीप बावनथडे, अशोक भांडारकर, झनकलाल ब्राह्मणकर, संजय पुंड यांचा उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. महिला पोलीस पाटलांमध्ये नर्मदा चुटे, खेमेश्वरी बोळणे, सरिता मेंढे, सुलोचना बहेकार, चंद्रकला हरीणखेडे, देवेश्वरी पारधी यांचा देखील सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम पोलीस पाटलांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणारा ठरला. विविध सण-उत्सव आणि निवडणुकांदरम्यान शांतता राखण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांना संपूर्ण पोलीस यंत्रणेकडून आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात आमगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.