राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशस्वी वाटचालीसाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
सडक/अर्जुनी येथे तेजस्विनी लॉनमध्ये पक्ष संघटन व विकासावर चर्चा
गोंदिया: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महायुतीच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या प्रचंड यशानंतर आज गोंदिया जिल्ह्यातील सडक/अर्जुनी येथे तेजस्विनी लॉनमध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पक्षाच्या यशानंतर आलेल्या जनतेच्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आगामी काळातील विकासाच्या दिशेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “गोंदिया व भंडारा जिल्ह्यात खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पडली. जनतेने विकासासाठी दिलेला कौल आम्हाला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देतो. महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी मतदार बांधव आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. आगामी काळात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर दिला जाईल.”
बैठकीदरम्यान, पक्ष बांधणीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आणि लोकांच्या अडचणींवर काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, आगामी स्थानिक निवडणुका आणि इतर उपक्रमांसाठी रणनीती ठरविण्यावरही चर्चा करण्यात आली.
बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह सर्वश्री देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, अविनाश काशिवार, सुधाताई रहांगडाले, तेजराम मडावी, रजनी गिऱ्हेपुंजे, वंदना डोंगरवार, रमेश चुर्हे, गजानन परशुरामकर, शिवाजी गहाणे, डी.यु. रहांगडाले, दिनेश कोरे, जुबेर शेख, भय्यालाल पुस्तोडे तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी, उपस्थितांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.