



‘फैरी लँड’ आणि ‘द लँड ऑफ हिरोज’ थीमने विद्यार्थ्यांनी रंगत आणली
आमगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, रिसामा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात प्रथमतः ‘फैरी लँड’ (परियों की दुनिया) आणि ‘द लँड ऑफ हिरोज’ (स्वातंत्र्यवीरांचा देश) या विशेष थीमवर आधारित सादरीकरणे करण्यात आली.
पहिल्या दिवशी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध परीकथांवरील वेशभूषा परिधान करून रंगमंचावर नृत्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. या रंगीबेरंगी सादरीकरणाने ‘फैरी लँड’ चे दर्शन घडवले आणि कार्यक्रमाचा माहोल आनंदी केला.
दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘द लँड ऑफ हिरोज’ या थीमवर स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची गाथा नृत्याद्वारे सादर केली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दृश्य त्यातील नृत्याद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आले. त्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने संपूर्ण प्रेक्षकांना प्रेरणा दिली.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेत वर्षभर विविध क्षेत्रांत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे ज्येष्ठ गौसेवक शंकरलाल अग्रवाल, बी.जे. हॉस्पिटलचे डॉ. निलेश जैन, डॉ. शेफाली जैन, डॉ. लता जैन आणि डॉ. विकास जैन हे उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी आमगाव येथील आर.एस.एस.चे प्रा. अनिल जोशी, सौ. अश्विनी जोशी, श्री मनीष शर्मा, डॉ. सोमाणी आणि सौ. डॉ. सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रत्येक पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कलागुणांचा विकास महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले. शाळेच्या शिक्षिका शिवानी छपरिया आणि श्रुती गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले.
शाळेच्या व्यवस्थापक डॉ. ललित कलंत्री, लीलाधर कलंत्री, डॉ. जितेंद्र वाडके, डॉ. भाग्यश्री वाडके, डॉ. लता जैन, डॉ. विकास जैन, श्री राजेश गोयल आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मृती छपरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.शेवटचा सोहळा राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना कलागुणांच्या प्रदर्शनाबरोबरच स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची शिकवण दिली.
श्रीमती स्मृती छपरिया यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.


