

पेठ तालुक्यातील आदिवासी भागात सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
नाशिक : जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटपाचा उपक्रम राबवला.

“ते हात नेहमी पवित्र असतात जे प्रार्थनेपेक्षा सेवेला जास्त महत्त्व देतात,” या उक्तीला साजेसा उपक्रम फाउंडेशनने सादर केला. पेठ तालुक्यातील तोंडवळ, रानविहीर, बेलपाडा, गायधोंड, आडगाव (बु.), मांडणपाडा आदी गावांतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयजीपी (स्पेशल) दत्तात्रय कराळे, अशोका ग्रुपच्या सौ. आशाताई कटारिया, आणि नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्वेटर प्रदान करण्यात आले.

स्वेटर वाटपामुळे थंडीपासून संरक्षण मिळणार या कल्पनेने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.
आयजीपी दत्तात्रय कराळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण कितीही मोठे झालो तरी मूळ गाव आणि संस्कृती विसरायची नाही,” तसेच गावातील स्वच्छतेचे आणि शाळेच्या स्वागताचे कौतुक केले.
रामभाऊ हरी इंपाळ, ज्यांनी स्वतःची जागा शाळेला दान केली, यांचा कराळे सरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सौ. आशाताई कटारिया यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांना नेहमी सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या नेतृत्वाखाली संस्था नेहमीच आदिवासी दुर्गम भागांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. आयजीपी कराळे सरांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक करत भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला सौ. अलका पाटील, आयआयटी दिल्लीची विद्यार्थिनी कृ श्रेष्ठ सोमवार, पोलीस निरीक्षक डी. एम. गोंदके, माजी सरपंच तुकाराम पांडूरंग भोये, पीएसआय के. एम. दरगुडे, सोमनाथ नाटे, रतन गांगुर्डे, पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अशोका ग्रुपचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे संदीप देव यांनी विशेष परिश्रम घेतले.

हा उपक्रम केवळ गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यापुरता मर्यादित नसून, सामाजिक बांधिलकी, सहकार्याची भावना आणि दुर्गम भागातील मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा एक यशस्वी प्रयत्न ठरला. “जिथे कमी तिथे आम्ही” या उक्तीला साजेसा असा हा उपक्रम नमस्ते नाशिक फाउंडेशनने यशस्वीपणे राबवला.






