संदर्भ: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा प्रशासन निर्णय क्र. संकीर्ण२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३, दि. ९ जुलै, २०२४
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधी वाढवण्याची व विद्यावेतन वाढवण्याची विनंती केली आहे. यासंबंधी अर्ज अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
राज्य शासनाने सुरू केलेली “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” ही बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची संधी ठरली आहे.
योजना अंतर्गत तरुणांना शासकीय कार्यालयांमध्ये विविध विभागांमध्ये अनुभव मिळत असून, त्यामुळे त्यांना शासकीय कामकाजाची व्यावसायिक जाण मिळत आहे.
प्रशिक्षणार्थ्यांना वेळोवेळी मिळणाऱ्या विद्यावेतनामुळे (स्टायपेंड) त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे.
सध्याच्या नियमानुसार प्रशिक्षण कालावधी केवळ ६ महिन्यांचा आहे.
गोंदिया जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ मध्ये रुजू झाले असून, त्यांचा प्रशिक्षण कालावधी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये संपणार आहे.
त्यानंतर त्यांना पुन्हा बेरोजगारीचा सामना करावा लागणार असल्याने कालावधी वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :1. प्रशिक्षण कालावधी वाढविण्यात यावा :६ महिन्यांच्या मर्यादेऐवजी अधिक दीर्घकालीन कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात यावे.
2. विद्यावेतन वाढविण्यात यावे: महागाईचा विचार करून सध्याचे विद्यावेतन वाढवून अधिक योग्य दराने मिळावे.
प्रशिक्षणार्थ्यांनी शासनाकडे त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करावा, अशी विनंती केली आहे.
“आपल्या निर्णयामुळे आमच्या रोजगाराला दिशा मिळेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल,” असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या अर्जाद्वारे प्रशासनाला आवाहन केले आहे की, सरकारने लवकरात लवकर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, जेणेकरून या योजनेतील सर्व सहभागी तरुणांना भविष्यासाठी योग्य दिशा आणि संधी मिळू शकेल.
गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने सादर केलेले निवेदन

