हिमालय मुनिश्वर यांची जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे कनिष्ठ सहाय्यक पदी निवड

0
106
1

सडक अर्जुनी तालुक्यातील केसलवाडा गावातील हिमालय मुनिश्वर यशस्वी

सडक अर्जुनी : तालुक्यातील केसलवाडा गावातील रहिवासी हिमालय छगनलाल मुनिश्वर यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे कनिष्ठ सहाय्यक पदी निवड होण्याचा मान मिळवला आहे. हिमालय यांनी २०२३ मध्ये न्यायालयीन विभागाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, त्यांच्या कर्तृत्वामुळे तालुक्यासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

हिमालय मुनिश्वर यांचे शिक्षण जि. प. हायस्कूल, सडक अर्जुनी येथे झाले. त्यांनी इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले. २०१७ साली बारावी उत्तीर्ण केल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी. ए. पूर्ण केले. ग्रामीण भागातील बेताच्या आर्थिक परिस्थितीतूनही हिमालय यांनी चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर स्वतःचे ध्येय साध्य केले. शिक्षणासाठी घरी शैक्षणिक वातावरण नसताना त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवत मोठे यश संपादन केले आहे.

हिमालय मुनिश्वर यांच्या या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल मेश्राम यांनी त्यांच्या सत्कारासाठी कार्यक्रम आयोजित केला. या प्रसंगी मेश्राम यांनी हिमालय यांना दुपट्टा, भारताचे संविधान, पेन, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी अनिल मेश्राम यांनी हिमालय यांचे विशेष कौतुक करत सांगितले, “ग्रामीण भागातील बेताची परिस्थिती असूनही हिमालय यांनी जे यश मिळवले, ते प्रेरणादायक आहे. त्यांनी गावासाठी आदर्श निर्माण केला आहे.” पुढील वाटचालीसाठी त्यांनी हिमालय यांना शुभेच्छा दिल्या.

हिमालय मुनिश्वर यांचे यश गावातील तरुणांसाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे. त्यांची मेहनत आणि चिकाटीमुळे ग्रामीण भागातील युवकांना नवीन दिशा मिळाली आहे. त्यांच्या यशामुळे केसलवाडा गावात उत्साहाचे वातावरण आहे.