जत्रेची परंपरा कायम; 12 ते 31 डिसेंबरपर्यंत कार्यक्रम
आमगांव : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या आमगाव येथील चंपाषष्ठी जत्रेचे आयोजन यंदा 12 ते 31 डिसेंबरपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती व माजी आमदार केशवराव मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. जत्रेची परंपरा खंडित होऊ नये यासाठी बाजार समितीने आवश्यक ती खबरदारी घेत जत्रेला परवानगी दिली आहे.
जत्रेच्या उद्घाटन सोहळ्यास बाजार समिती संचालक संजय नागपुरे, युवराज बिसेन, विनोद कन्नमवार, अनिल शर्मा, महेश उके, गणेश हर्षे, सचिन अग्रवाल, सोमेश असाटी, उत्तम नंदेश्वर, बंटी अग्रवाल, धनलाल मेंढे, सचिव गजेंद्र चुटे यांच्यासह जत्रा समितीचे अशरफ भाटी, अजय खेतान, सुनील पडोळे उपस्थित होते.
दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या चंपाषष्ठी जत्रेची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. नागपूर येथील भाटी अॅम्युझमेंट कंपनीचे अशरफ भाटी यांच्या पुढाकाराने आणि बाजार समितीच्या सभापतींसह संचालक मंडळाच्या सहकार्याने या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रेमध्ये भाटी अॅम्युझमेंट कंपनीतर्फे आकर्षक मनोरंजन साधने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पंचक्रोशीतून हजारो लोक या जत्रेसाठी येण्याची अपेक्षा आहे.

