स्पर्धा परीक्षांमध्ये वाचनालयाचा आधार, मुंबई पोलीस पदासाठी यशस्वी निवड
आमगाव : भवभूती शिक्षण संस्था संचालित आदर्श सार्वजनिक वाचनालय आमगाव येथील अभ्यासिका वर्गाची विद्यार्थिनी संध्या हरिप्रसाद धामडे हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस शिपाई पदाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. संध्या हिने वाचनालयात नियमित अभ्यास करून हे यश मिळवले असून, तिच्या कृतज्ञतेच्या भावनेतून वाचनालयाला सिलींग पंखा भेट दिला आहे.
आदर्श सार्वजनिक वाचनालय, आमगाव हे गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. वाचनालयात सुरू असलेल्या अभ्यासिका वर्गामुळे अनेक विद्यार्थी यशस्वी होत आहेत. संध्या धामडे ही त्या वर्गातील नियमित विद्यार्थीनी होती. तिने सातत्यपूर्ण अभ्यास आणि वाचनालयातील पोषक वातावरणाचा फायदा घेत मुंबई पोलीस पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.
संध्याने वाचनालयाला दिलेला सिलींग पंखा तिच्या यशाची आठवण म्हणून राहणार आहे. यामुळे वाचनालयातील इतर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना दिलासा मिळणार आहे.
संध्याच्या या यशाबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष सुनील पडोळे, सचिव विनायक अंजनकर, उपाध्यक्ष कुंज बिहारी शर्मा, सहसचिव ललित मानकर, झेड. एस. बोरकर, होमेद्र पटले, योगिता हलमारे, डॉ. तेजस्विनी भुस्कुटे, डॉ. साजिद खान व वाचनालयातील इतर सदस्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
संध्या धामडेने मिळवलेल्या या यशामुळे वाचनालयातील इतर विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वाचनालय हे एक आदर्श केंद्र ठरले आहे.

