वनविभागाची कौतुकास्पद कामगिरी; कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी वासराला जीवदान
आमगाव तालुक्यातील टीएमव्हीपी टीमने तातडीने केली शस्त्रक्रिया
आमगाव : तालुक्याच्या बोरकन्हार येथील जंगलात सायंकाळ दरम्यान दि.१७ डिसेंबर रोजी वनविभागाच्या पथकाने कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नीलगाय नर वासराला तातडीने वाचवून वैद्यकीय उपचारासाठी आमगाव येथील टीएमव्हीपीकडे हलवले. (जी. एम. पटले – आर. ओ. आणि पी. बी. भगत – बीट गार्ड) यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकाने ही बचाव मोहीम राबवली.
टीएमव्हीपी आमगाव येथे डॉ. सचिन कोकोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रोहन मालकर आणि डॉ. प्रेनल बडवाईक यांनी वासरावर शस्त्रक्रिया केली. संपूर्ण उपचार प्रक्रियेत जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले आणि सहायक पशुधन आयुक्त डॉ. शैलेंद्र पटेल यांनीही मार्गदर्शन केले.
प्रकरणाचे तपशील व उपचार:
वासराच्या शरीरावर कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमा होत्या.
उजव्या बाजूच्या पोटाचा स्नायू फाटल्यामुळे तातडीने ओटीपोटाच्या स्नायूंना शिवणकाम करून ड्रेसिंग करण्यात आले.
वासराच्या सुरक्षेसाठी अँटी-रेबीज डोस देण्याचे निर्देश वनविभागाला देण्यात आले.
दुसरा पर्याय नसल्याने शस्त्रक्रिया तातडीने पार पाडण्यात आली.
या घटनेतून वन्यजीवांच्या रक्षणासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. वनविभाग व पशुवैद्यकीय टीमच्या समन्वयामुळे वासराचा जीव वाचवण्यात यश आले. ही घटना वन्यजीव संरक्षणासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरली आहे.

