शेतकऱ्यांचा गौरव आणि कृषी प्रगतीला प्रोत्साहन
आमगाव : भारतीय स्टेट बँक, आमगाव शाखेच्या वतीने दि.२३ डिसें.रोजी”अन्नदाता दिवस” मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कृषी व्यावसायिक शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमगाव शाखेने शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार करून विशेष उपक्रम राबवले. कार्यक्रमामध्ये यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांची यशोगाथा समोर मांडण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी तुकाराम बोहरे होते, तर उद्घाटन तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
“शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा,” असे तहसीलदार मोनिका कांबळे यांनी शेतकाऱ्याना संबोधित करते वेळी विचार व्यक्त केले.
भारतीय स्टेट बँक, आमगाव शाखेचे व्यवस्थापक भास्कर चाचरकर यांनी शेतकऱ्यांसाठी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी विशेषतः कृषी कर्ज, तांत्रिक सल्लामसलत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चा केली.
आरबीओ (Regional Business Office) विभागाचे प्रमुख विलास सोनटक्के यांनी बँक आणि शेतकऱ्यांमध्ये सुसंवाद वाढवून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी बँकेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते बबलू कटरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “देशाच्या विकासात अन्नदात्यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, सरकारी धोरणांमुळे मध्यमवर्गीय शेतकरी आर्थिक संकटात अडकतो. यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट राखून आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा,” असे ते म्हणाले.
वरिष्ठ पत्रकार धनराज भगत यांनी देशातील कृषी धोरणांवर मोलाचे मार्गदर्शन केले. “शेतकऱ्यांनी जागरूक राहून बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आर्थिक प्रगतीसाठी योगदान दिलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सत्कार मूर्ति परमानंद मेश्राम, संतोष पारधी,सुनील मटाले,विजय मानकर,तुकाराम बोहरे,सुरेश बोहरे,उमेदलाल जैतवार,प्रदीप मोहरे,विजय लिल्हारे,संतोष दोनोड,सुभाष उपराडे, कुंवरलाल दमाहे,छाया चूटे, पायल मुनेश्वर,सुनीता मेश्राम या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शेती क्षेत्रात उत्तम प्रगती साधली.
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली. पीक कर्ज योजना,कृषी यंत्रसामग्रीसाठी कर्ज,ट्रॅक्टर कर्ज योजना,पाणी व्यवस्थापनासाठी अनुदानित योजना तंत्रज्ञानावर आधारित कृषी सल्लामसलत सेवा महत्त्वपूर्ण योजनाबड्डल माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी या योजनांचा फायदा घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात आणखी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप प्रबंधक प्रवीण बिसेन यांनी केले.प्रबंधक भास्कर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सोनू श्रीभाद्रे,हितेश सुलाखे,करीना ब्राह्मणकर,पायल बोपचे,सरिता लक्षणे व सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
“अन्नदाता दिवस” हा शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणारा आणि त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम ठरला.”शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये प्रगती साधावी आणि बँकेच्या योजनांचा उपयोग करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
“अन्नदाता दिवस” हा शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.”

