नागपूर – शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण यांसारख्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी नक्षली ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयूआय) राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी केला आहे. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
वरुण चौधरी म्हणाले की, “देशातील तरुण वर्गाला शिक्षण, नोकऱ्या आणि मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी सरकारविरोधात आंदोलन करावे लागत आहे. अशा आंदोलनांना दडपण्याचा आणि विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” शासकीय धोरणांमध्ये होत असलेल्या उणिवांमुळे लाखो विद्यार्थी हक्कासाठी रस्त्यावर उतरले असताना, त्यांना नक्षली ठरवण्याची भाषा निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
एनएसयूआयची राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा सेवाग्राम येथे नुकतीच पार पडली. यामध्ये संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर चर्चा केली. कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. त्यांनी सरकारकडून विद्यार्थ्यांच्या हक्कांची गळचेपी थांबवण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एनएसयूआय सातत्याने लढत राहणार असून, त्यांच्या समस्यांवर तोडगा निघेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असेही चौधरी यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांना एकत्र येऊन संघटितपणे सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशातील तरुणाईच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अन्यथा याचा तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.