



गोंदिया : जिल्ह्यात 7 लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादी देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम (वय 27, रा. गुंडम सुटबाईपारा, ता. ऊसुर, जि. बिजापुर, छत्तीसगड) याने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. माओवादी संघटनेत वरिष्ठ कॅडरकडून होणारा छळ, आर्थिक लूट आणि अव्यवस्थित जीवन यामुळे त्याने हिंसेचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
माओवादी देवा याने मा. प्रजित नायर (जिल्हाधिकारी, गोंदिया), गोरख भामरे (पोलीस अधीक्षक, गोंदिया) आणि नित्यानंद झा (अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया) यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
माओवाद्याच्या प्रवासाचा थरार : देवा उर्फ अर्जुन याने 2014 मध्ये पामेड दलममध्ये भरती होऊन शस्त्र उचलले. त्यानंतर अबुझमाड येथे प्रशिक्षण घेतल्यावर त्याला एम.एम.सी. झोनकडे पाठविण्यात आले. 2014 ते 2019 या काळात त्याने विविध दलांमध्ये काम करत मोठ्या हल्ल्यांत सहभाग घेतला. त्यामध्ये टिपागड फायरींग (गडचिरोली), झिलमिली काशीबहरा फायरींग (राजनांदगाव), चौकी जाळपोळ, किस्टाराम ब्लास्ट (सुकमा) यांचा समावेश आहे.
माओवादी चळवळीतील फसवे धोरण, आर्थिक शोषण, आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष, वरिष्ठांच्या मनमानी आदेश, विवाहानंतरही वैवाहिक जीवन जगता न येणे, आणि पोलीस दलाचे सतत नक्षलविरोधी अभियान यामुळे त्याने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला.
शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा प्रभाव : महाराष्ट्र शासनाने माओवादी चळवळीवर नियंत्रण आणण्यासाठी राबविलेल्या आत्मसमर्पण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 2005 पासून आतापर्यंत 23 माओवादी गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पित झाले आहेत.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन : गोंदिया पोलीस दलाचे गोरख भामरे यांनी सांगितले की, “हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होऊ इच्छिणाऱ्या माओवाद्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन पुनर्वसनासाठी मदत करण्यात येईल.”
गोंदिया पोलिसांच्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे आणि आत्मसमर्पण योजनेमुळे अजूनही माओवादी आत्मसमर्पण करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


