

विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले
आमगाव, २७ डिसेंबर – गोंदिया पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आदर्श विद्यालय, आमगाव येथे दिनांक २७ डिसेंबर रोजी सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी जागरूक करण्यात आले.
कार्यक्रमाला सायबर विभागाचे संजय मारवाडे आणि महिला सेलच्या तनुजा मेश्राम मॅडम यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हजेरी लावली. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कसे घडतात, त्यांना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डी. बी. मेश्राम आणि पर्यवेक्षक यू. एस. मेंढे मंचावर उपस्थित होते. ८वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या सत्रात संजय मारवाडे यांनी सायबर क्राईमची उदाहरणे आणि प्रतिबंधक उपाय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तनुजा मेश्राम मॅडम यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षिततेसाठी कसे दक्ष राहावे आणि संकटांना कसे सामोरे जावे, याविषयी उपयुक्त टिप्स दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक यू. एस. मेंढे यांनी केले, तर शिक्षक टी. टी. तुरेकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.






