आमगाव : येथील के. के. इंग्लिश प्रायमरी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरे करण्यात आले. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन, मान्यवरांच्या उपस्थितीत आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाले.
स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी, दिनांक २६ डिसेंबर २०२४ (गुरुवार) रोजी उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे मान्यवर पाहुणे म्हणून आमगावच्या तहसीलदार मा. मोनिका कांबळे मॅडम उपस्थित होत्या.
उपरोक्त कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर,अध्यक्ष सुरेश बाबू असाटी,उपाध्यक्ष प्रमोद कटकवार तसेच भवभूती शिक्षण संस्थेच्या सदस्या श्रीमती स्नेहा मानकर ताई,उर्मिला ताई कावळे, हरिहर मानकर,ललित मानकर,सलाहकार म्हणून डॉ. डी. के. संघी सर उपस्थित होते. प्राचार्या श्रीमती रीना भूते यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी, दिनांक २७ डिसेंबर २०२४ (शुक्रवार) रोजी, SDRF नागपूरचे टीम कमांडर सुनील चव्हाण सर आणि कैलास पुसाम सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. त्यांनी देशातील विविध संस्कृतींचे दर्शन घडवत आपले सुप्त गुण सादर केले.
संचालन मुकुल अग्रवाल यांनी केले.आभार प्रदर्शन माया फुंडे आणि निधी चौहान यांनी पहिले दोन दिवस आभार प्रदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी, दिनांक २८ डिसेंबर २०२४ (शनिवार) रोजी विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.
बक्षीस वितरण समारंभात श्रीमती स्नेहा मानकर ताई आणि प्राचार्या श्रीमती रीना भूते यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरणानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी दाखवलेली कला, संस्कृती आणि स्पर्धेतील जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. या कार्यक्रमाने शाळेच्या सांस्कृतिक परंपरेला नवी उंची दिली आहे.

