गोंदिया-देवरी बससेवेचा आमगाव बसस्थानकावर थांबा व्हावा – नागरिकांची मागणी

0
214
1

बसस्थानकावर थांबा न केल्यास पोलिसांत तक्रारीचा इशारा

आमगाव : गोंदिया-देवरी मार्गावरील बससेवा आमगाव बसस्थानकावर थांबवावी, अशी जोरदार मागणी आमगाव येथील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात विनायक अंजनकर यांनी गोंदिया आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले असून, मागणी पूर्ण न झाल्यास बसचालक व वाहकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

गोंदिया ते देवरी आणि देवरी ते गोंदिया मार्गावर धावणाऱ्या बस थेट मार्गावरून जातात. त्यामुळे या बस आमगाव बसस्थानकावर थांबत नाहीत. प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विनायक अंजनकर यांनी अनेकदा या समस्येबाबत निवेदन दिले असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शेवटी त्यांनी आज पुन्हा एक निवेदन सादर करून 2 जानेवारीपासून बसस्थानकावर थांबा सुरू न झाल्यास संबंधित चालक आणि वाहकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

आमगावच्या नागरिकांनी बसस्थानकावर थांबा सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.