आमगाव: आदर्श सार्वजनिक वाचनालय, आमगाव येथे विविध स्पर्धा तसेच कथा, धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक पुस्तकांचे भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक यु. एस. मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष सुनील पडोळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास महारवाडे, अनिल शेंडे आणि ग्रंथपाल जगदीश बडगे उपस्थित होते.
राज्यात शासकीय आणि शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांमध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्रचा” हा उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत जिल्हा ग्रंथालय कार्यालय, गोंदिया यांच्या सूचनेनुसार या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
अभ्यासिका वर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पुस्तकप्रेम वाढवण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

