दिवंगत भाऊदास नंदेश्वर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली—सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन

0
313

आमगांव : प्रबोधिनी प्रसारक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, आमगावचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत भाऊदास नंदेश्वर यांची पुण्यतिथी संकल्प शाळा, गाहेरवारटोला (पुराडा) येथे गुरुवारी दि.२ जाने. रोजी भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करून त्यांच्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्यात आला. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल.

कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. उत्तम नंदेश्वर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, आमगाव), शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर अंबादे, शिक्षिका उईके, तोरणकर मॅडम, उपराडे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बैसजी, वसतिगृह अधीक्षक भुवन हरीणखेडे आणि साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी दिवंगत भाऊदास नंदेश्वर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव करत त्यांची प्रेरणादायी कार्यशैली विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाच्या परीक्षेद्वारे अध्ययन व बौद्धिक विकासाची संधी मिळाल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत भाऊदास नंदेश्वर यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि अभ्यासाची आवड निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.