विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ स्तुत्य उपक्रम – प्राचार्य भुवनकुमार बिसेन

0
91

जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन; वाचन संस्कृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

गोंदिया : विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची जाणीव निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना मनोहर म्युन्सीपल हायस्कूल, गोंदियाचे प्राचार्य भुवनकुमार बिसेन यांनी ‘पुस्तकांशी मैत्री करून ध्येय साध्य करा’ असा संदेश दिला.


जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथप्रदर्शनी उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे आणि ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे उपस्थित होते.
प्राचार्य बिसेन यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे वळविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्राप्तीचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि कवी कुसुमाग्रज यांच्या विचारांचा आधार घेत आपली वाटचाल करावी, असे आवाहन केले.
“पुस्तके हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे शस्त्र आहेत. ती वाचून व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ करता येते,” असे सांगून बिसेन यांनी तरुणांना प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाची सवय लावण्याचा सल्ला दिला.

जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचनाची सवय उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची’ असल्याचे सांगितले. “वाचाल तर वाचाल” हा मंत्र देत त्यांनी विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी केले. त्यांनी सांगितले की, ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

“सामूहिक वाचन, कार्यशाळा, संवाद, कथन स्पर्धा, पुस्तक परीक्षण, ग्रंथप्रदर्शन आणि विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी यासारखे उपक्रम हाती घेतले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे यांनी केले. त्यांनी उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि वाचकांचे आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, वाचक, सभासद आणि अभ्यासक उपस्थित होते.

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थी वाचनसंस्कृतीकडे वळतील, असे मत व्यक्त करून उपस्थितांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे आकर्षित करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री, ध्येय निश्चिती, आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

उपरोक्त कार्यक्रमासाठी मनोहर म्युन्सीपल हायस्कूलचे प्राचार्य भुवनकुमार बिसेन,जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे,ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे आदि मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.