आमगाव : तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ शाळा पदमपूर येथे सुजाण नागरिक मंच अंतर्गत स्थापित संविधान गुणगौरव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत संविधान गुणगौरव परीक्षा २०२४ चे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय अध्यक्ष विलास पवार आणि मुख्य मार्गदर्शक नुरखा पठाण तसेच जिल्हा संयोजक तथा केंद्रीय सदस्य अनिल मेश्राम सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनात परीक्षा घेण्यात आली.
परीक्षेच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सहा. शि. संदिप नंदेश्वर यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून विदयार्थ्यांना संविधान गुण गौरव परीक्षेचे उद्देश आणि ध्येय समजावून सांगितले. तसेच बालिका दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यानी नृत्य, भाषण, चित्रकला, गीत गायन, निबंध स्पर्धेत भाग घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस.डी. मच्छीरके मॅडम यांच्या नेतृत्वात संदिप नंदेश्वर यांनी केंद्रप्रमुख म्हणून तर, पर्यवेक्षक म्हणून प्रिती डोंगरे मॅडम आणि पल्लवी बिसेन मॅडम यांनी काम पाहिले. या परीक्षेत शाळेतील एकूण 63 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. शाळेतील तूरकर मॅडम, वालोदे सर, भोयर मॅडम, बागडे मॅडम, गडपांडे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी पदक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

