गडचिरोली-चिमूरमध्ये सौर आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्याची मागणी मान्य

0
274

ऊर्जा विकासावर भर..! संसदीय स्थायी समितीची चेन्नईत बैठक संपन्न

चेन्नई (तामिळनाडू): संसदेच्या ऊर्जा विभागाच्या संसदीय स्थायी समितीची बैठक चेन्नई येथे समितीचे अध्यक्ष श्रीरंग अप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशभरातील विविध ऊर्जा प्रकल्प आणि विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार व समिती सदस्य डॉ. किरसान यांनी आपल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सौरऊर्जा (Solar Energy) आणि जलविद्युत (Hydro Electricity) प्रकल्प प्राथमिकतेने उभारण्याची मागणी केली.

बैठकीत डॉ. किरसान यांनी गडचिरोली आणि आसपासच्या आदिवासी व ग्रामीण भागात ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी या भागात प्रायोगिक तत्वावर हे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडला. सोलर पॉवर प्लांट उभारण्याच्या मागणीला समितीने तत्वतः मान्यता दिली, ज्यामुळे या भागातील वीज उपलब्धतेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
याशिवाय, जलविद्युत प्रकल्पासाठी देखील या भागाची भौगोलिक रचना आणि नैसर्गिक संसाधनांचा विचार करून विशेष अभ्यास करण्याची सूचना करण्यात आली. हे प्रकल्प उभारले गेले तर ऊर्जा निर्मितीबरोबरच रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीत खासदार छत्रपती साहू महाराज (कोल्हापूर), शामकुमार बर्वे (रामटेक), शिवाजी काळगे (लातूर) आणि इतर सदस्यांनी भागातील विविध समस्यांवर प्रश्न मांडले. त्यांनी ऊर्जा निर्मिती, वितरण आणि ग्रामीण भागातील वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे सल्ले दिले.
ऊर्जा क्षेत्रातील विविध उपाययोजनांचा आढावा घेताना, देशाच्या ऊर्जा गरजांसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय साधण्यावर चर्चा झाली.

बैठकीत ऊर्जा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, समिती सदस्य आणि ऊर्जा तज्ञ उपस्थित होते. खासदारांनी प्रस्तावित प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. यासंदर्भात समितीने पुढील निर्णयासाठी लवकरच अहवाल सादर करण्याचे ठरवले.

Previous articleजिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
Next articleपोलीस स्थापना दिन उत्साहात साजरा – विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती