आमगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
आमगाव : तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चिचगढ येथील ढासगड मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष प्रा. झेड एस बोरकर आणि ज्येष्ठ पत्रकार इशुलाल भालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पत्रकारितेतील त्यांचे योगदान अधोरेखित केले.
ज्येष्ठ पत्रकार इशुलाल भालेकर यांनी पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “पत्रकारिता निर्भीड आणि निपक्ष असावी. पत्रकारांनी सत्यासमोर ठामपणे उभे राहून समाजात न्याय मिळवून द्यावा.”
अध्यक्षीय भाषणात प्रा. झेड एस बोरकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा मागोवा घेतला. त्यांनी सांगितले की, “बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे कार्य आमगाव तालुका पत्रकार संघ अविरतपणे करत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव फुंडे यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र कावळे यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन दिनेश शेंडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला पत्रकार यशवंत मानकर, राधाकिशन चुटे, रितेश अग्रवाल, सुनील पडोळे, अजय खेतान, आनंद शर्मा, विकास शर्मा, रेखलाल टेंभरे यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला वंदन करत आमगाव तालुका पत्रकार संघाने त्यांच्या विचारांचा जागर घडवला. या कार्यक्रमातून पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक आणि सामाजिक न्यायासाठी लढा देण्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळाली.

